मावळमित्र विशेष:
राज्यभरातील सर्व राजकारण्यांनी आदर्श घ्यावा असे आदर्शवत नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले.राजकारणातील भलं मोठं नाव.शेकापचे जेष्ठ नेते आदरणीय आबासाहेब अर्थात गणपतराव देशमुख अनंतात विलीन झाले. गणपतराव देशमुख  तथा आबासाहेब यांनी सांगोला मतदारसंघाचं नेतृत्व केले. मातीशी नाळ जोडलेले आणि शेवटच्या घटकांपर्यंत राबवले आबा सर्वमान्य,सर्वसमावेशक नेते होते.
राजकारणातील सर्व रेकॉर्डची नोंद आबांच्या नावावर नोंदले आहेत.
सांगोला विधानसभा मतदारसंघ हा सर्वात आगळावेगळा मतदारसंघ. एक पक्ष, एक व्यक्ती, एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला राज्यभर ओळखले जाते. शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार आबासाहेब ऊर्फ गणपतराव देशमुखांमुळे या मतदारसंघाची ही ओळख निर्माण झाली.आबासाहेब या मतदारसंघातून तब्बल ११ वेळा निवडून आले. विधानसभेत ५० वर्षे त्यांनी सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले. मुख्यमंत्रीपदाची संधीही त्यांना चालून आली होती.विधानसभेच्या दोन निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.
एसटी आणि रेल्वेने प्रवास करणारा आमदार म्हणूनही त्यांच्याबद्दल राज्यातील नागरिकांना नेहमीच कुतुहूल वाटायचे. त्यामुळेच त्यांच्या साधी राहणीमानाची नेहमीच चर्चा व्हायची. माणदेशाच्या माळावर गुराढोरांच्या संगतीत राबणाऱ्या माणसाचा नेता अशी त्यांची ख्याती होती. सांगोला तालुक्यासाठी उजनी धरणातून पाणी आणण्यासाठी त्यांनी मोठा संघर्ष केला होता. त्यांच्या संघर्षामुळेच सांगोल्याला उजनीचे पाणी मिळू शकले.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापन केले. त्यावेळी आबासाहेब देशमुखांचा त्यांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला. शेकापने काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारला पाठिंबा दिला. तेव्हाही गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता. हा अपवाद वगळता ते नेहमी विरोधी पक्षातच राहिले.
आबासाहेब देशमुख यांचा जन्म १० ऑगस्ट १९२६ला सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पिंपरी येथे झाला. त्यांचं मराठी, हिंदी आणि इंग्रजीवर प्रभुत्व होतं. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय राहिला. १९६२ ला त्यांनी सांगोल्यातून सर्वप्रथम निवडणूक लढली होती. २०१२ मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या कारकीर्दीस ५० वर्षे पूर्ण झाल्याने त्यांचा गौरव करण्यात आला होता.
सर्वात वयस्कर आमदार म्हणूनही गणपतराव देशमुख यांची ओळख होती. अकरा वेळा निवडून विधानसभेवर निवडून येण्याचा विक्रमाचीही देशमुख यांच्या नावे नोंद आहे. आबासाहेबांच्या जाण्याने राजकारणातील एका पर्वाचा अस्त झाला.

error: Content is protected !!