वडगाव मावळ:
मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे भातशेतीसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मावळ हा भातशेती साठी प्रसिद्ध तालुका म्हणून ओळखला जातो. बहुतांश शेतकरी हा भाताची लागवड करत असतो. भाताचे पीक जोमात आले असताना मुसळधार पावसाने हजेरी लावत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे.
यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.चार दिवसात ५०० मिलीमीटर पेक्षा अधिक पाऊस कोसळला आहे.
या अतिवृष्टीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहेत. अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे बाधीत शेतीचे पिक व फळबाग यांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.त्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला असुन त्यानुसार ११७२ हेक्टर शेतीवरील जिरायती व बागायती पिकांचे नुकसान झाले.त्यात २६३४ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी देवेंद्र ढगे यांनी दिली. अतिवृष्टीचा १३२ गावांतील शेतीस फटका बसला आहे . त्यात २४५६ शेतकऱ्यांच्या १ हजार १८ हेक्टरवरील भात पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.तर ३७ शेतकऱ्यांच्या ४६ हेक्टर वरील भुईमूग पिकाचे नुकसान झाले आहे .९२ शेतकऱ्यांच्या १०८ हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. जिरायती पिकांखालील एकूण ११७२ हेक्टर क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे.
बागायती पिकांमध्ये १४ शेतकऱ्यांच्या २.३० हेक्टर वरील भाजीपाला पिकाचे नुकसान झाले आहे. ३५ शेतकऱ्यांच्या १७ हेक्टर क्षेत्रावरील ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. बागायती पिकां खालील १९ .३० हेक्टर शेतीस फटका बसला आहे . असे एकूण ११९१.३० हेक्टर वरील ७ ९ लाख ६९ हजार ६०० रुपयांचे नुकसान झाल्याचा अहवाल तयार केला आहे .
अतिवृष्टीमुळे दरड कोसळणे,जमीन खरडणे नदीपात्रातील पाणी शेतीत शिरणे , प्रवाह बदलामुळे शेतजमीन वाहून जाणे , शेतीचे बांध फुटणे अशा स्वरूपाच्या २९ गावातील ६५५ शेतकऱ्यांच्या २४६.३५ हेक्टर वरील शेतीचे नुकसान झाले आहे .कृषी विभागाने असे एकूण ३२ लाख २५ हजार रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती दिली आहे.दोन्हीही मिळून १ हजार ४३७ हेक्टर शेतीवर १ कोटी ११ लाख ९४ हजार रुपयांचा अंदाजपत्रक अहवाल तयार केला असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.
तालुका कृषीधिकारी देवेंद्र ढगे म्हणाले,” मुसळधार पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषी सहायक , तलाठी व ग्रामसेवक पंचनामे करीत आहेत. शेतकऱ्यांनी कृषी सहायक , तलाठी , ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून नुकसानीचे पंचनामे करून घ्यावेत.

error: Content is protected !!