तुकाराम भाऊराव उर्फ शिवशाहीर आण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ‘वाटेगाव’ या लहानशा गावात झाला.अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकतीने हाताळले.तांत्रिकदृष्ट्या पुर्ण निरक्षर,अशिक्षित अशा आण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड्ःमय,कथा,नाट्य, लोकनाट्य,कादंबरी,चित्रपट,पोवाडे,लावण्या,वग,गवळण,प्रवासवर्णन इ.सर्वच प्रकार समृद्ध व सशक्त केले…तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय आण्णाभाऊंनाच दिले जाते.पोवाडे,लावण्या,गीत,पद या काव्यप्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला..स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात राजकीय प्रश्नांविषयी त्यांनी मोठी जागृती केली.त्यात संयुक्त महाराष्ट्र चळवळ,गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी शाहीरीतून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.1944 ला त्यांनी ‘लाल बावटा’ हे पथक स्थापन केले आणि बघता बघता ते शाहीर झाले.” माझी मैना गावाकडे राहिली,माझ्या जीवाची होतीया काहिली” ही त्यांची लावणी सर्वांधिक लोकप्रिय झाली..आण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्याच्या माध्यमातून रशियापर्यंत सांगितले…पुढे त्याचे रशियन भाषेत भाषांतर झाल्यानंतर राष्ट्राध्यक्षांनीही कौतूक केले..16 आँगस्ट 1947 रोजी त्यांनी ‘ये आझादी झुठी है,देश की जनता भुखी है’ असा नारा दिला व मुसळधार पावसातही ते मागे हटले नाहीत.आण्णाभाऊंनी आपल्या लेखनकाळातील अल्पायुष्यात 21 कथासंग्रह व 30 पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या.त्यापैकी 7 कादंबऱ्यावर आधारीत चित्रपट नामांकित दिग्दर्शकांनी काढले…त्यांनी लिहिलेल्या ‘फकिरा’ या कादंबरीला 1961 सालचा राज्य शासनाचा सर्वोत्कृष्ठ कादंबरी हा पुरस्कार मिळाला…तत्कालीन जेष्ठ साहित्यिक वि.स.खांडेकर यांनी या कादंबरीचे कौतूक केले

भारतरत्न डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखनीला अर्पन केलेल्या ‘फकिरा’ मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटीशांचा खजिना,धान्ये इ.लुटून त्याचे गरिबांना वाटप करणाऱ्या फकिरा या मातंग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण केलेले आहे…त्यांच्या ‘वैजयंता’ या कादंबरीत तमाशात प्रथमच काम करणाऱ्या महिलेच्या शोषणाचे चित्रण केले आहे तर ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सुक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे…आण्णांनी विविध भूमिकाही योग्यरितीने वठवून आपल्या प्रतिभेची चुणूक दाखवली..संपूर्ण आयुष्य त्यांनी चिरागनगर येथील झोपडपट्टीत व्यतीत केले…तेथेच एकापेक्षा एक अशा सर्व लेखन साहित्याची निर्मिती झाली.जातीभेद,गरिबी व भेदाभेद यांमुळे अवघ्या दीड दिवसातच शाळा सोडावी लागलेल्या आण्णाभाऊंनी साहित्य क्षेत्रात केलेली कामगिरी ही प्रचंड मोठ्या स्वरुपाची आहे…आपल्या लेखणी व प्रतिभेच्या जोरावर बुद्धिमत्ता ही कोणाची मक्तेदारी नाही,हे दाखवणाऱ्या आण्णाभाऊंना आदरांजली. (शब्दांकन:उमेश माळी,सर)

error: Content is protected !!