वडगाव मावळ:
वडगाव मावळच्या माळीनगर व दिग्विजय कॉलनीत सतत खंडित होणा-या वीज पुरवठ्याचा प्रश्न नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागणार आहे. माळीनगर व दिग्विजय कॉलनीचा काही भाग हा गेल्या अनेक वर्षांपासून कामशेत फिडरवर आहे.
हा भाग वगळता संपूर्ण वडगाव परिसर सेप्रेट वडगाव फिडरवर आहे. कामशेत येथील फिडरवर कामशेत व ग्रामीण भाग असल्याने दरवर्षी पावसाळ्याच्या काळात वीज पुरवठा सतत खंडित होत असतो.
अनेक वर्षापासून रहिवाशी ही समस्या सहन करीत आहेत. येथील स्थानिक रहिवाशांनी आमदार सुनिल शेळके व नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत हा प्रश्न मांडला होता. त्यावर आमदार शेळके यांनी मुख्य अभियंता विजय जाधव यांना आदेश देऊन संबंधित विषय मार्गी लावण्याच्या सूचना केल्या होत्या. नगराध्यक्ष मयुर ढोरे यांना लक्ष देण्याचे सुचवले होते.
नगराध्यक्ष ढोरे यांनी महावितरणचे सहाय्यक अभियंता शाम दिवटे यांच्याशी कामाबाबत वेळोवेळी चर्चा व पाठपुरावा केला .भेगडे लॉन्स परिसरामधील काम थांबले असल्याची माहिती मिळाली. तेव्हा संबंधित स्थानिक लोकांशी चर्चा करून कामातील अडथळा दूर करण्यात यश आले व अनेक वर्षापासून थांबलेले काम चालू झाले असून येत्या पंधरा दिवसात माळीनगर व दिग्विजय कॉलनी परिसरातील खंडित वीज पुरवठ्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे.
हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी सतत पाठपुरावा करून स्थानिक अडचणी सोडवल्याने काम सुरू झाले आहे. या कामी बंडोपंत भेगडे यांनी चांगले सहकार्य केले. नगरसेवक राजेंद्र कुडे उपस्थित होते.

error: Content is protected !!