वडगाव मावळ:
कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण गंभीर होण्याचे प्रमाण वाढत चालले असताना प्लाझ्मा दिल्यावर रूग्ण लवकर बरा होत असल्याचे सकारात्मक परिस्थीतीआहे.मात्र प्लाझ्मा मिळवताना रुग्णाच्या नातेवाईकांची होणारी धावपळ पाहून मावळ तालुक्यातील तरुणांनी प्लाझ्मादानासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला .
आणि त्यांनी प्लाझ्मा हेल्पलाईन व्हाॅटस अप ग्रुप बनवला. या ग्रुपच्या माध्यमातून अवघ्या २० दिवसात ५७ पेक्षा अधिक रुग्णांना वेळेत लाभ मिळवून दिला आहे. डॉक्टरांनी प्रिस्क्रिप्शनमध्ये प्लाझ्मा लिहून दिल्यानंतर त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांची मोठी धावपळ होते. त्यांचे नातेवाईक सोशल मीडियामध्ये याबाबत मागणी चे मेसेज फिरवून प्लाझ्मा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
या पार्श्वभूमीवर २७ एप्रिल रोजी सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष सदानंद पिलाणे आणि सहकारी निखिलेश पुनमिया, राजेंद्र सातपुते यांनी एकत्र येत व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ‘HELPLINE’ सुरू केली. या ग्रुपच्या माध्यमातून लोकांना प्लाझ्मा दाना बद्दल माहिती देण्यात आली.
तसेच कोरोनातून बरे झालेल्या व्यक्तींना प्लाझ्मा देण्यासाठी प्रवृत्त करण्यास सुरुवात केली.
१ मे रोजी झालेल्या संस्थेच्या बैठकीत तसेच व्हाॅटसॲपवरही प्लाझ्मा देण्याबद्दल जागृती व आवाहन करण्यात आले होते आणि यातुनच प्लाझ्मादानाची चळवळ उभी राहिली.
प्लाझ्मा देणारे डोनर शोधणे, त्यांना रुग्णाच्या नातेवाईकांशी जोडून देऊन भोसरी, पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये पाठवून, वेळेप्रसंगी स्वत: गाडीमध्ये प्लाझ्मादात्याला रक्तपेढ्यांमध्ये घेऊन जाऊन त्यांचे प्लाझ्मादान करून घेऊन तो प्लाझ्मा रूग्णांपर्यंत पोहच करणे, असे काम केले गेले.
गेल्या २० दिवसांमध्ये या टीमने ५७ पेक्षा अधिक रुग्णांना मदत मिळवून दिली आहे. चेतन वाघमारे, निलेश ठाकर, सचिन शेडगे, अंकुश काटकर, किरण मराठे, सुमित कडु हे या उपक्रमासाठी परिश्रम घेत आहे.
■प्लाझ्मा, ऑक्सिजन बेड, व्हेंटिलेटर, ॲम्ब्युलन्स मिळवून दिले
सदानंद पिलाणे म्हणाले,”
सामाजिक बांधिलकी जपत आजवर ५७ पेक्षा अधिक गरजु रूग्णांना मदत केली आहे. दिवसाला २० पेक्षा अधिक फोन येतात, त्यावर काम केले जाते पण २० पैकी फक्त ४ ते ५ लोकांपर्यंत मदत पोहचवण्यात यश येते. कारण आपल्या मावळ तालुक्यात अजुनतरी एकही प्लाझ्मा सेंटर नाही त्यामुळे येथून पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यातील रक्तपेढ्यांमध्ये जाऊन प्लाझ्मा मिळवण्यासाठी तासंतास थांबवे लागते.
संस्थेच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन लवकर आपल्या मावळ तालुक्यात प्लाझ्मा सेंटर व्हावे अशी मागणी देखील करण्यात आली आहे.
या कार्यात वडगाव येथील भुषण मुथा याचं सहकार्य मिळाले.

error: Content is protected !!