वडगाव मावळ:
कोरोना महामारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी मावळ तालुक्यात आतापर्यंत १८०७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सहा कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आली आहेत. दोन नवीन ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प, एक नवीन गॅसदाहिनी उभारणीचे काम सुरू आहे. रुग्णांच्या सेवेसाठी तालुक्‍यात १४ मोफत रुग्णवाहिका, एक मोफत शववाहिका सुरू आहे. दिवसाला १० हजार नागरिकांच्या लसीकरणाचे उद्दिष्ट्य ठेवण्यात आले आहे.
कोरोनाची तिसरी लाट आली तरी तिला सक्षमपणे तोंड देण्यासाठी आवश्यक नियोजन व तयारी करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुनिल शेळके यांनी पत्रकार परिषदेत दिली.गेल्या दीड महिन्यातील मावळ विधानसभा मतदारसंघातील कोरोना स्थिती व केलेल्या उपाययोजना याबाबत आमदार शेळके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.
मावळ तालुक्याच्या आजुबाजूला ऑक्सिजन प्लांट कुठे आहेत, याची माहिती घेऊन तालुक्यात ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवणे, रेमडेसिवीर उपलब्धता करण्यासाठी प्रयत्न केला. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केल्याचे त्यांनी सांगितले.  
●कान्हे व काले येथे ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प
भविष्यातील गरज लक्षात घेऊन कान्हे व काले (पवनानगर) या दोन ठिकाणी नवीन ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणीचे काम सुरू करण्यात आले असून वडगाव येथील स्मशानभूमीत नवीन गॅसदाहिनी बसविण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.
प्रशासनाने तालुक्यात तळेगाव दाभाडे, लोणावळा, वडगाव, कामशेत, सोमाटणे, गहुंजे, वराळे, टाकवे, जांबवडे, कान्हे, नवलाख उंब्रे, इंदोरी, साळुंब्रे  हॉटस्पॉट जाहीर केले व सहा दिवस स्वयंस्फूर्तीने लॉकडाऊन पाळला, लॉकडाऊनचे तंतोतंत पालन केल्यामुळे नियंत्रणात आल्यासारखे दिसत आहे. त्याबद्दल मावळच्या जनतेला धन्यवाद देतो. लॉकडाऊन संपला असला तरी गर्दी करू नका, मास्क, सोशल डिस्टन्सिंग आदी नियमांचे पालन करावे, असे आवाहन शेळके यांनी केले
तालुक्यातील ८४ टक्के रुग्णांची कोरोनावर मात मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण २० हजार ७१२ जणांना कोरोना संसर्ग झाला. त्यापैकी  १७ हजार ६७२ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले. तर तालुक्यात एकूण ४१० मृत्यूंची नोंद झाली, सद्यस्थितीत २६३० सक्रिय रुग्ण असून बरे होण्याचा दर ८३.९५ टक्के तर मृत्यूदर २ टक्के आहे, अशी आकडेवारी त्यांनी जाहीर केली. कोविड सेंटर व खाजगी रुग्णालयांमध्ये एकूण ५९१ विलगीकरण बेड,९०८ ऑक्सिजन बेड, २१२ आयसीयू व ९८ व्हेंटिलेटर कार्यान्वित आहेत. तसेच कान्हे व पवनानगर ग्रामीण रुग्णालय व देहुरोड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर
रुग्णालय या ठिकाणी प्रत्येकी ३०. मोफत ऑक्सिजन बेड उपलब्ध आहेत, अशी माहिती आमदार शेळके यांनी दिली.
● कोविड केअर सेंटरमध्ये आणखी १८०० बेडचे नियोजन
सुगी पश्चात केंद्र, तोलानी इन्स्टिट्यूट, समुद्रा इन्स्टिट्यूट, लोणावळा नगरपरिषद, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड या सहा ठिकाणी दीड महिन्यांपासून कोविड केअर सेंटर सहा ठिकाणी सुरू आहेत. त्या ठिकाणी एकूण ७४६ बेडची व्यवस्था आहे. सध्या या केंद्रांमध्ये ४२३ रुग्ण उपचार घेत असून ३२३ बेड उपलब्ध आहेत. अजून गरज लागली तरी १८०० बेडचे नियोजन करून ठेवले आहे, असे शेळके यांनी सांगितले.
●पाच रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजना   मायमर हॉस्पिटल, अथर्व हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, संत तुकाराम हॉस्पिटल देहू व संजीवनी हॉस्पिटल लोणावळा या पाच रुग्णालयांत महात्मा फुले जनआरोग्य योजना सुरू आहे. रुग्णालयात दाखल होताना रेशन कार्ड व आवश्यक कागदपत्रे जावे व योजनेच्या लाभासाठी रुग्णालय व्यवस्थापनास सांगावे, अशी माहिती त्यांनी दिली. शासनाने निर्धारित केलेल्या दरांपेक्षा उपचारांसाठी जादा दर आकारले जात असतील, तर त्या रुग्णालयांविषयी तक्रार करावी, असे आवाहन त्यांनी केले. 
●मोफत रुग्णवाहिका सुविधा
रुग्णांसाठी शासनाच्या ६ , देहू नगरपंचायत १ , राष्ट्रवादीच्या २ , आमदार निधीतून १ , कार्ला देवस्थान १, जनसेवा विकास समिती १, देहूरोड येथील डॉ. आंबेडकर रुग्णालयात २ अशा १४ रुग्णवाहिका व सत्यनारायण चॅरिटेबल ट्रस्टची एक शववाहिका मोफत सेवा देत असल्याचे आमदार शेळके यांनी सांगितले.
●दिवसाला १० हजार लसीकरणाचे उद्दिष्ट्य
एकूण २६ केंद्रांवर लसीकरण सुरू असून लस उपलब्ध झाली तर दररोज १० हजार लसीकरण करण्याचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले. लसीकरण केंद्र लोणावळा-खंडाळा, तळेगाव २ व देहूरोड व वडगाव येथे एक केंद्र वाढविण्यात आले आहे. लसीच्या उपलब्धतेनुसार लसीकरण केंद्रे वाढविण्याचे नियोजन केले आहे.
●दररोज ८२५ जणांना मोफत शिवभोजन थाळी
गोरगरीबांसाठी शिवभोजन थाळीच्या माध्यमातून दररोज ८२५ नागरिकांना लाभ मिळत आहे. अजून १०० मोफत थाळ्यांची उपलब्धता आहे. 
नागरिकांना सुलभ उपचार मिळावेत यादृष्टीने आवश्यक ते सर्व प्रयत्न केले जातील, फक्त नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे, डॉक्टरांनी रुग्णांवर सहानुभूतीपूर्वक उपचार करावेत, असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.
●महिलांसाठी एचआरसीटी टेस्ट फक्त ५०० रुपयांत
दरम्यान कोरोना निदानासाठी करावी लागणाऱ्या एचआरसीटी टेस्टसाठी शासनाने दोन हजार रुपये दर
निश्चित केला आहे; परंतु मावळातील महिला रुग्णांचे वाढते प्रमाण व महिलांना दिलासा देण्याच्या उद्देशाने आजपासून कुलस्वामिनी महिला मंच व मावळ तालुका राष्ट्रवादी महिला आघाडीच्या माध्यमातून सहा ठिकाणी सवलतीच्या दरात फक्त ५०० रुपयांत ही टेस्ट केली जाणार असल्याची घोषणा आमदार शेळके यांनी यावेळी केली.
पवना हॉस्पिटल, पायोनियर हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, साक्षी डायग्नोस्टीक सेंटर, मायमर हॉस्पिटल, लोणावळा सिटी स्कॅन सेंटर या ठिकाणी ही सुविधा उपलब्ध आहे.  

error: Content is protected !!