वडगाव मावळ:
ग्रामपंचायतीचा कारभार पाहत असताना सरकारकडून जे काही मानधन मिळेल त्या मानधनाचा उपयोग गावातील निराधार, गरजू ज्येष्ठ नागरिकांच्या औषधोपचारासाठी करण्याचा संकल्प कशाळ गावचे उपसरपंच श्री. तुळशीराम पोपट जाधव यांनी केला. काही महिन्यांपूर्वी तुळशीराम जाधव यांनी ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची जबाबदारी हाती घेतली. जबाबदारी घेतानाच त्यांनी गावाच्या विकासाची स्वप्न पाहिली. मानधनातून मिळणारा एकही रूपया आपल्या संसाराला लावायचा नाही, असे ठरविले आणि संकल्प सोडला. सध्या कोरोनाने थैमान मांडले,दवाखान्यात औषधोपचारासाठी काय,दवाखान्यात जायला प्रवासासाठी देखील कित्येक निराधारांकडे खर्चाला पैसै नसल्याची उदाहरणे पाहून,सहृदय असलेल्या तुळशीराम यांनी मानधनाची रक्कम निराधारांसाठी खर्च करण्याचे नियोजन केले आहे.
गाव पातळीवरील काम करत असताना अनेकदा त्यांनी स्वखर्चाने काही गोष्टी केलेल्या आहेत. ग्राम पंचायत कार्यालयासमोर लॉन लावणे, वृक्षारोपण करणे, तरुणांशी संवाद, महिला सबलीकरण, मन की बात, ग्राम स्वच्छता अभियान, आरोग्य सर्वेक्षण, इतर सामाजिक कार्यक्रमांना कुठेही काहीही कमी पडले तर स्वतः पुढाकार घेऊन निभावून नेण्याचा प्रयत्न ते करीत असतात.
निवडणूकीच्या आधीही तुळशीराम जाधव यांनी रामकृष्ण हरी ग्रुप आणि मनशक्ती केंद्र, लोणावळा यांच्या मदतीने अनेक सामाजिक कार्य केले आहे. मनशक्तीचे ‘समाजासाठी रोज एक तास’ हे व्रत गेली अनेक वर्षे ते पाळत आहेत. समाजात वावरत असताना आपणही समाजाचं देणं लागतो, याची जाणीव असणं महत्त्वाचं आहे. आणि या जाणिवेतूनच अनेक समाजाभिमुख गोष्टी सुचत असतात. या सुचलेल्या गोष्टी निःस्वार्थी हेतूने करत राहणं, यातच स्वतःचं आणि समाजाचं कल्याण आहे, हे मानणारा हा तरूण कार्यकर्ता अनेक समाजोपयोगी उपक्रमांवर भर देईल अस दिसतेय.
अत्यंत हलाखीची परिस्थिती असताना आणि अजिबात ऐपत नसताना मनशक्ती केंद्राच्या कमवा आणि शिका योजनेचा आधार घेत घेत अगदी एम बी ए पर्यंत शिक्षण घेतलेला हा तरूण आजच्या पिढी पुढे आदर्श आहे.उपसरपंच जाधव पुण्यामध्ये एका नामवंत बँकेत नोकरी करत आहेत.
आपल्या गावामध्ये भौतिक विकास तर होतच राहील, त्याचबरोबर प्रत्येकाचा मनोविकास घडविणे हेही तितकंच जिकिरीचे असते. आणि हेच आवश्यक आहे.
नवीन सुसंस्कृत पिढी घडविण्यासाठी गुणसंपन्न शिक्षणावर भर देणे गरजेचे आहे. त्यासाठी विविध संकल्पना मांडणे गरजेचे आहे. त्या संकल्पना कृतीत आणण्यासाठी प्रयत्न करणे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या सगळ्या नावीन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचा त्यांचा मनोदय आहे.
भविष्यात शासनाच्या मदतीने, आमदार निधी, खासदार निधी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून, मोठ्या कंपन्यांच्या माध्यमातून सामाजिक विकास निधी मिळवून गावकऱ्यांच्या मदतीने अनेक योजना राबविण्याचा त्यांचा मानस आहे.

error: Content is protected !!