बहिण भावाच्या नात्याची वीण फक्त राखी पौर्णिमेला किंवा भाऊबीजेला अधिक घट्ट होते.असे नाही या नात्यातील रेशम धागा आयुष्यभर विणला जातो.भावाच्या बळावर बहिणीचे माहेरपण आणि सासरपण मोठया दिमाखात जात,तस माझ्याही आईचे गेले.
माझ्या आईने मला आणि माझ्या भावंडाना तळहाताच्या बोटाला आलेल्या फोडा प्रमाणे जपलं आणि वाढवलं.
आमची माय आज आमच्यात नाही,पण आजच्या मातृदिनी तिची आठवण आली.आणि नकळत जुन्या आठवणीचा उमाळा आला.
माझ्या आईचे नाव मुक्ताबाई मुक्ताजी भागवत,निगडे हे आमचं गाव. पूर्वीपासूनच निगडे गाव म्हणजे ओसाड माळरानावर गवताचे पिक बहरलेले गांव ही ओळख असलेले लाल मातीच्या कौलारू घरांचे गाव. गाव दुष्काळात टिपनळीने पाणी भरायचं,मिळेल ती भाजी भाकरी खाऊन आनंदाने जगायचं. शेतीला दुधाची साथ आणि गाई म्हशीला चा-याचा आधार.
हाच चारा कापायला बाया बापडे पहाटे घर सोडयाचं आणि दुपारच्या न्याहारीला घरी परतायचे .बैलगाडीतून गवताच्या पेंढया तळेगावच्या गवत बाजारात विकायच्या.सगळ्या गावाचा हाच उद्योग व व्यवसाय,माझ्याही आई वडिलांची हीच जगण्याची रीत.
आई मुक्ताबाई आणि वडील मुक्ताजी भागवत गवत काट्यावर जाऊन गवताची कापणी करुन प्रपंचाचा रहाटगाडा हाकायची.
काट्यावर मिळालेल्या मजुरीवर आमच्या घराची गुजराण होत असायची.गवताचा काटा संपल्यानंतर निगडे गांवची नेहमीप्रमाणे होणारी पिण्याच्या पाण्यासाठी होणारी वणवण तिने अनुभवली, पाण्यासाठी सगळ्या प्रमाणे तिचाही जीव टांगणीला लावायचा. एप्रिल व मे या दोध महिनाभर पाण्याची टिपणळ असायची. त्यामुळे हे दोन महिने पाणी – पाणी करताच निघुन जायचे.
त्यानंतर नेहमी प्रमाणे पारंपारिक पध्दतीने करावी लागणारी शेती व त्यातून मिळणारे तुटपुंजे उत्पन्न असाचा रहाटगाडा सुरू होता.
भातरोपे तयार करा, भातलावणी, नंतर काढणी ही पारंपारिक पध्दतीने केली जाणारी शेती आई करायची.शेतात कष्ट अफाट पण उत्पन्न मात्र फारच नगण्य अशी आमची काय आख्ख्या मावळाची अशीच शेती. त्यामुळे कुटूंब चालविणे म्हणजे तारेवरची कसरत असायची. भात आणि शाळु म्हणजेच ज्वारी या दोन पिकांवर संपूर्ण वर्ष अवलंबून असणारे आमचे भागवत कुटूंब.
संपूर्ण गांवची उपजीविकेसाठी हीच अवस्था असायची.
अत्यंत काबाडकष्ट करत असताना आईचा भाऊ मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती गणपतराव शेडगे यांचा कायम मायेचा हात आईच्या डोक्यावर असायचा, बहिण भाऊ एका विचाराने वागायचे. सुख दु:खाला धावून जायचे. कायमच ऐकामेकाची विचारपूस मोठया अस्थेने करायचे.
भाऊ गणपतराव शेडगे यांच्या पत्नीचे निधन झाल्यानंतर त्यांचा एक महिन्याचा मुलगा तुकाराम आणि माझा तिने एकञ पालन केले,संगोपन केले. एकाच बादलीतील पाण्यात आम्हाला न्हानले,एकाच बाळुत्तयाने पुसले आणि एकाच गोधडीवर झोपवून अंगाई गायली. तिचा हा
आदर्श आमच्या नात्यात गोत्यात फार आदर्श आहे.
मी शिक्षण घेऊन मोठे व्हावे ही माझ्या माऊलींची मनोमन इच्छा.मी निगडे येथे सातवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण घेतले. पुढील शिक्षणासाठी मामाच्या आधारावर कामशेत गाठले
पंडीत नेहरु विद्यालयात इयत्ता दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर पदवीपर्यंचचे शिक्षण तळेगांव येथील इंद्रायणी महाविद्याल येथे पूर्ण केले. हे सर्व करत असताना मोलमजूरी, काबाडकष्ट करुन तिने माझे शिक्षण पूर्ण केले. आई व मामा यांच्या
मार्गदर्शनाखाली सहकार व्यवस्थापन पदविका, जी.डी.सी.अँन्ड ए., एच.डी.सी.एम. हे सहकार खात्याचे कोर्स मी पूर्ण केले.
सन २००४ मध्ये माझ्या वडीलांचे निधन झाले. कुटूंबाच्या पालनपोषणाची जबाबदारी मातेच्या अंगावर पडली. आपल्या मुलांना व मुलींना सोबतीला घेऊन कुटूंबाची गुजराण करण्याबरोबर आपल्या मुलामध्ये समाजकार्याची आवड निर्माण केली.तिचा एकच आग्रह असायचा कष्ट करा,नीट वागा.मीही तिच्या स्वप्नाचा आदर केला.दिवस पालटले,आर्थिक सुबत्ता येत होतीच,गावचे उपसरपंचपद मिळाले.
टिपनळीच्या पाण्याची समस्या पूर्पणे सोडविली. निगडे गांवच्या विकासामध्ये सिंहाचा वाटा उचलला. रस्ते, वीज, पाणी, अनेक वर्षापासूनची स्मशानभुमीची समस्या सोडवली. ग्रामदैवत काळभैरवनाथ देवाचे भव्य – दिव्य मंदिर उभारण्यामध्ये महत्त्वाचे योगदान दिले याचा मला आनंद आणि समाधान आहे. हे बाळकडू आईकडून मिळाले.
तिच माहेर गोविञी नाणे मावळतील गाव,वडीवळे धरण व माहेरच्या शेतीजवळ असणारी नदी माहेरी भावांची बागायती शेती,या शेतात मोठ्या प्रमाणावर ऊस पिकतो. हे सर्व पाहिल्यावर आपल्या मुलांनीसुध्दा शेतीमध्ये आधुनिकता आणावी असे मातेचे स्वप्न. गावातील सर्व शेतकऱ्यांना एकच आणून न्यायालयीन लढाई लढून गवत पिकवणारा या गावाची बागायती शेती करणारे गाव ही ओळख निर्माण केली. अनेक कुटूंबाना रोजगार मिळाला.
माझा कामशेत व पुणे येथे प्रिंटींग प्रेसचा व्यवसाय आहे,पत्नी प्रतिभा पी.डी.सी.सी. बँकेत शाखा व्यवस्थापिका आहेत. माझा भाऊ जयराम व राजाराम बागायती शेती करतात. पुतण्या संतोष पोलीस पाटील आहे.शेतीप्रधान कुटूंबातील असणारी ही माता जिने आपल्या मुलांना घडविले. ही माता काळाच्या पडद्याआड शुक्रवार दि. ११/१२/२०२० रोजी गेली. ती आम्हाला सोडून गेली असली तरी तिच्या स्मृतींची घराचा कोपरा अन कोपरा आठवण करून देत आहे. माझ्या या मातेला मातृदिना निमित्त विनम्र अभिवादन..
(शब्दांकन- भिकाजी भागवत,निगडे)

error: Content is protected !!