वडगाव मावळ:
मावळ तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी मावळ तालुक्यातील तसेच परिसरातील गरजू रुग्णांना प्लाझ्मा मिळणेसाठी तसेच प्लाझ्मा दान करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेसह अद्ययावत प्लाझ्मा सेंटर कार्यान्वित करण्यात यावे ही मागणी भारतीय जनता पार्टी , वडगांव शहर यांच्या वतीने करण्यात आली.
सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आढळून येणाऱ्या कोरोना ( कोविड १९ ) महामारीवर अनेक शासकीय तसेच खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना उपचार सुरू आहेत आणि
बऱ्याच ठिकाणी उपचारासाठी रुग्णांना मोठ्या प्रमाणावर ” प्लाझ्मा ” ही उपचार पद्धती अवलंबली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.कोविड १९ संदर्भात असलेल्या तांत्रिक आणि शासकीय बाबींच्या पुर्तनेनंतरच संबंधित व्यक्ती स्वतः चा प्लाझ्मा एखाद्या रुग्णासाठी देऊ शकतो मात्र यांसाठी त्यांना पिंपरी चिंचवड अथवा पुणे या ठिकाणी जावे लागत आहे.
या प्रकियेसाठी किमान ३ ते ४ तासांचा अवधी देखील लागत आहे त्याचबरोबर जाण्यायेण्याचा वेळ आणि शहरी भागात वाढलेल्या कोरोनाचे प्रमाण यांमुळे अनेक प्लाझ्मा दाते आपला प्लाझ्मा दान देण्यापासून वंचित रहात आहेत.
मावळ तालुक्यात देखील दररोज अनेक रुग्णांना प्लाझ्मा ची आवश्यकता भासत आहे , प्लाझ्मा देणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे मात्र मावळ तालुक्यात एकही प्लाझ्मा सेंटर कार्यान्वित नाही.
प्लाझ्मा दान करण्यासाठी अथवा प्लाझ्मा मिळविण्यासाठी पिंपरी चिंचवड अथवा पुण्याला जावे लागत आहे त्यामुळे तेथील ” ब्लड बँक अथवा प्लाझ्मा सेंटर्स ” यांच्यावर देखील मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे.
गरजू रुग्णांचे नातेवाईक , मित्र अनेक सामाजिक आणि राजकीय संस्था , संघटना आणि कार्यकर्ते या प्लाझ्मा प्रकियेत कार्यरत देखील आहेत .
याचा फायदा गरजू रुग्णांना होणार आहे यांमुळे शारीरिक श्रम , वेळ यांची मोठ्या प्रमाणात बचत होऊन आर्थिक खर्च देखील कमी होणार आहेत अशी माहिती देखील या निवेदनात देण्यात आली आहे.
सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू असतांनाच आता पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असल्याच्या पार्श्वभूमीवर मावळात ” स्वतंत्र प्लाझ्मा सेंटर ” असणे ही काळाची गरज आहे.
त्यांमुळे मावळ तालुक्यात मध्यवर्ती ठिकाणी शासकीय अथवा खाजगी पद्धतीने तातडीने प्लाझ्मा सेंटर कार्यान्वित करावे अशी आग्रही मागणी भारतीय जनता पार्टी वडगांव शहराच्या वतीने मा.तहसीलदार साहेब, मावळ यांना करण्यात आली.
निवासी नायब तहसीलदार मा.रावसाहेब चाटे यांनी हे निवेदन स्विकारले.यावेळी वडगांव शहर भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष किरण भिलारे , सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर , व्यापारी मोर्चा अध्यक्ष भूषण मुथा , मावळ तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे , मा.उपसरपंच सुधाकर ढोरे, नगरसेवक अ‍ॅड.विजयराव जाधव , नगरसेवक किरण म्हाळसकर , नगरसेवक प्रसाद पिंगळे, अरुण सुळके आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!