
वडगाव मावळ:
फार कमी वयात वडीलांचे छत्र हरपलं..आईने मायेची ऊब दिली अन त्यात तो सावरला..कष्ट त्याच्या पाचवीलाच पुजलेले..रानावनात काटया कुटयात तो चालत राहिला. गायी,वासरे,म्हशी संभाळल्या.धो धो पावसात अंगावर इरणे घेऊन महिनाभर भात लावणी..बेणणी..उन्हातान्हात भाताची कापणी झोडपणी..करीत राबत राहिला.
त्याच्या कष्टाला समृद्धीची फळ आली. तो तरूण शेतकरी दूध उत्पादक संस्थेचा संचालक,ग्रामपंचायत सदस्य,खरेदी विक्री संघाचा चेअरमन अशा पदाची बिरुदावली मिळवून राजकारणात ही सक्रीय राहिला.
प्रकाश धोंडिबा पवार असे या तरूणाचे नाव,कष्टाच्या जोरावर त्याने खूप काही मिळवले. पण आयुष्यात दु:खाच्या अनेक खपल्यांच्या जखमा त्याच्या अंगावर ओरडल्या.
पण तो तशाच जिद्दीने उठला,निखा-या सारखा फुलत राहिला. काम करीत राहिला. राजकारणात फार काही मिळाले नाही,पण श्रमप्रतिष्ठा त्याने जपली. रात्रंदिवस काबाडकष्ट हेच त्याचे भांडवल पण या जोरावर त्याच्या समाधानाचे जगण कष्टकऱ्यांना प्रेरणादायक आहे.
शेतीही कधीच किफायतशीर नसते असे मानणा-या अनेकांनी प्रकाश पवार यांच्या कडून धडे घेण्याची गरज आहे.
पावसाळ्यात लावलेल्या इंद्रायणी,कोळंबा,समृद्धी या भाताच्या वाणाची शेती करण्यात ते माहीर आहे. हिवाळ्यात काळ्या मातीत हरभरा,वाटाणा,मसूर ही कडधान्ये काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. तर उन्हाळ्यात बागायती शेती त्याच्या वावरात बहरलेली असते
शेतीला दुधधंद्याची जोड दिली तर ती किफायतशीर ठरते हे त्याने अनुभवातून सिद्ध केले आहे. सोबतीला पोल्ट्री फार्म हा व्यवसाय शेतक-याला हिताचा ठरतो हे गणित त्याला उमगले आणि याही क्षेत्रात त्याचे उत्तम बस्तान आहे. राजकारणातील अनेक चढउतार पाहिलेला हा तरूण बाराही महिने शेतात राबताना दिसेल.
हे सगळ आज मांडण्याचा हेतू एकच कष्टका-या बळीराजाच्या कष्टाची प्रतिष्ठा जपली पाहिजे,त्याच्या राबवणा-या हाताचे आणि कष्टाचे कौतुक झाले पाहिजे.
आज आजोबा झालेल्या तरूणाचा वाढदिवस आहे,त्याच्या मित्र परिवाराकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हे सगळ ऐकले आणि आपसूक चार शब्द लिहले.


