वडगाव मावळ:
कोरोनाचे संक्रमण वाढत आहे, गावकरी लाॅकडाऊन मध्ये अडकले आहेत. सार्वजनिक व खाजगी प्रवाशी वाहनातून प्रवास करता येत नाही. खेड्यापाड्यातील सर्वसामान्य नागरिकांना लसीकरणासाठी केंद्रावर पोहचण्यासाठी मर्यादा आहे.
१ मे पासून १८ वर्षा पुढील सर्वाचे लसीकरण असल्याने लसीकरण केंद्रावर मोठी गर्दी होणे स्वाभाविकच आहे, त्यामुळे आरोग्य विभागाने गावात कोव्हिड लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी भोयरे ग्रामपंचायतीचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बळीराम भोईरकर यांनी केली आहे.
आंदर मावळातील चाळीस गावांसाठी टाकवे बुद्रुक हे आरोग्य केंद्र असून शिरे व नागाथली ही उपकेंद्र आहेत, लसीकरण सुरू आहे.टाकवे बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या आरोग्याधिकारी डाॅ. सुवर्णा आरोटे यांचे काम उत्तम आहे. आरोग्य केंद्रात नागरिकांनी लसीकरणासाठी यावे यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. नागरिकांना आरोग्य केंद्रावर येण्यासाठी वाहतुकीची सोय केली.
आरोग्य केंद्राला पुरवठा होणरे लसीकरण आणि प्रत्यक्ष लसीकरणासाठी येणा-या नागरिकांची संख्या यात मोठा फरक आहे. नागरिक आणि आरोग्य विभाग यातील समतोल या काळात राखणे अधिक सोयीचे ठरण्यासाठी गाव निहाय लसीकरण करण्यात यावे जेणे करून आरोग्य केंद्रात होणारी गर्दी टळेल.
आरोग्य केंद्रात एकीकडे लसीकरण सुरू आहे, तर दुसरी कडे कोरोना तपासणी.भोयरे गावामध्ये कोरोना लस केंद्र उपलब्ध होणे बाबतीत आम्ही आग्रही आहोत.
या बाबत मावळचे आमदार सुनिल शेळके, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांची भेट घेणार असल्याचे भोयरेचे सरपंच बळीराम भोईरकर, कशाळचे सरपंच मारूती खामकर, उपसरपंच तुळशीराम जाधव, निगडेचे सरपंच सविता भांगरे यांनी सांगितले.
या अनुषंगाने आरोग्य विभागाशी पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आंदर मावळातील ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता,व ग्रामीण भागातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता.भोयरे या ठिकाणी कोरोना लस केंद्र सुरु व्हावे.गावातील वयोवृध्द लोकांना टाकवे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रापर्यंत जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था होत नसल्यामुळे ९५ % लोकांनी अजून लस घेतलेली नाही.
तसेच भोयरे गाव हे शिरे उपकेंद्राच्या अंतर्गत येत असल्यामुळे भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर भोयरे कशाळ कल्हाट,पवळेवाडी कोंडीवडे या गावातील राहिलेल्या सर्व ४५ वर्षावरील लोकांना त्यांच्या गावात किंवा भोयरे याठिकाणी लस उपलब्ध व्हावी जेणेकरून या पाच गावातील लोकांना लस घेता येईल जेणेकरून करून ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होईल.
कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता,प्रत्येकाने आपल्या कुटूबाची काळजी घेणे आवश्यक आहे. याच धर्तीवर भोयरे ग्रामपंचायतीच्या वतीने माझे कुटूंब माझी जबाबदारी हे अभियान राबविले होते, या अभियानास गावक-यांनी साथ दिली असल्याचे सरपंच बळिराम भोईरकर यांनी सांगितले.

error: Content is protected !!