तळेगाव दाभाडे:
मावळातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून जाऊ नये, मावळातील ज्या हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधीत उपचार घेत आहेत,त्या रूग्णालयात आवश्यकतेनुसार रेमडेसीव्हीर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे रुग्णांना उपचार मिळण्यास मदत होणार असल्याची माहिती मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी दिली.
मावळातील कोरोना बाधीत रूग्णांवर रेमडेसीव्हीर इंजेक्शनने उपचार करण्याची गरज असल्याचे सबंधित डाॅक्टरांनी आरोग्यविभाग आणि आमदार सुनिल शेळके यांच्या निदर्शनास आणून दिले होते,याची दखल घेत आमदार शेळके यांनी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्याकडे मावळसाठी रेमडेसिवीरचे इंजेक्शन उपलब्ध व्हावेत,अशी मागणी केली होती.
या मागणीचा संवेदनशीलपणे विचार करुन जिल्हाधिकाऱ्यांनी मावळ तालुक्यासाठी आवश्यक इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत.
मावळ तालुक्यातील मायमर हॉस्पिटल ९१ , अथर्व हॉस्पिटल ८, ओम हॉस्पिटल ८, मावळ हॉस्पिटल २०, पवना हॉस्पिटल २० , तळेगाव जनरल हॉस्पिटल १९ , महावीर हॉस्पिटल १९ , आधार हॉस्पिटल १६ , मातोश्री हॉस्पिटल ५ॐ, बडे हॉस्पिटल १३ , स्पर्श हॉस्पिटल २७ , संजीवनी ९ , श्री हॉस्पिटल १४ , कृष्णदीप हॉस्पिटल ५ , या १४ हाॅस्पिटल मध्ये २७४ रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध झाले आहेत.
या हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना याचा नक्कीच लाभ होणार आहे.राज्यात उद्भवलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या प्रादुर्भावामुळे शहरी व ग्रामीण भागातील सामान्य व गरीब जनतेला उपचारासाठी इंजेक्शनची नितांत आवश्यकता असून ती उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी आमदार शेळके यांनी केली होती.
कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधक औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा प्रादुर्भाव झाल्यापासून रेमडेसिवीर नावाचे इंजेक्शन वापरण्यास आरोग्य यंत्रणांनी सुरुवात केली.
हे इंजेक्शन कोरोनावर प्रभावी ठरत आहे. यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित संख्या आटोक्यात येण्यास मदत झाली आहे. कोविड-१९ आजाराच्या रुग्णांवरील उपचारासाठी बऱ्याच औषधांचा वापर केला जात आहे. सध्या कोरोनाच्या आजारावर प्रामुख्याने रेमडेसिवीर इंजेक्शन हे औषध प्रभावी असल्याचे आढळून येत आहे.
मागील काही दिवसात अनेक शहरांमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा पाहायला मिळत आहे. मात्र आमदारांनी केलेल्या प्रयत्नामुळे मावळ तालुक्यात इंजेक्शन उपलब्ध झाल्यामुळे पेशंटसह नातेवाईकांनाही दिलासा मिळणार आहे.

error: Content is protected !!