मावळमित्र न्यूज विशेष:
छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा व तुकारामांच्या भक्तीने न्हाऊन निघालेला,भक्ती व शक्ती यांचा अनोखा संबंध असणारा ऐतिहासिक तालुका म्हणजे मावळ.गड-किल्ले, पांडवकालीन लेण्या,दुग्धव्यवसाय,पारंपरिक शेती व जीवाला जीव देणारी रांगडी माणसे हे मावळचे वैभव.लोणावळा,कामशेत,वडगाव,तळेगांव,देहूरोड अशी प्रमुख शहरे.आंदर मावळ,पवन मावळ व नाणे मावळ अशा ग्रामीण भागाचा विस्तीर्ण प्रदेश.दोन नगरपरिषदा,एक नगरपंचायत,१०२ ग्रामपंचायतीचा गावगाडा. मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग,मध्य रेल्वे मार्ग,द्रुतगती महामार्ग,विविध औद्योगिक वसाहती, मुंबई – पुणे शहरांना जोडणारा तालुका अशी मावळ तालुक्याची राज्यात ओळख आहे.

महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर अनेक मान्यवरांनी लोकप्रतिनिधी म्हणून तालुक्याचे प्रतिनिधित्व विधिमंडळात केले.अनेकांनी आपल्या कार्यकर्तृत्वाची छाप विधानसभेत पाडली व मावळ तालुक्याचे नाव उज्ज्वल केले.तळेगांव दाभाडे शहराला ऐतिहासिक वारसा आहे. याच शहरातील शेळके परिवार हा उद्योग,व्यवसाय व सामाजिक क्षेत्रातील कार्याने तालुक्यात सुपरिचित आहे .

याच सामाजिक कार्याच्या बळावर शेळके कुटुंबातील देखणा, उमदा व रुबाबदार तरुण श्री.सुनील शंकरराव शेळके हे तळेगांव नगरपरिषद निवडणुकीच्या रिंगणात उतरले.सार्वजनिक जीवनातील पहिली निवडणूक नेटाने लढले.परंतु गुंतागुंतीच्या राजकारणात अल्पशा मतांनी त्यांना अपयश आले.पहिल्याच प्रयत्नात यशाने हुलकावणी दिली.परंतु पराभवाने खचून जाईल तो कार्यकर्ता कसला? सुनील अण्णांनी आता अधिक जोमाने सामाजिक काम सुरू केले.महिला,युवक,जेष्ठ नागरिक यांसाठी विविध उपक्रम राबविले. भव्यदिव्य स्पर्धांचे आयोजन केले. त्यांचे आखीव-रेखीव नियोजन करुन पुन्हा एकदा त्याच जोमाने नगरपरिषद निवडणुकीला सामोरे गेले आणि अगदी सहजरित्या विजयाला गवसणी घातली.त्या विजयी दिवसापासून आण्णांची प्रत्यक्ष राजकीय कारकीर्द सुरू झाली.सभागृहात विविध विषयांना त्यांनी वाचा फोडली.

जनतेचे अनेक प्रश्न सोडवले.कधी शासकीय पातळीवर तर कधी स्वखर्चाने अनेक विषय मार्गी लावण्यासाठी त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली.पुढे २०१६ ची नगरपरिषद निवडणूक आली.आण्णांचे प्रचंड काम पाहून त्यांचे राजकीय प्रतिस्पर्धी देखील खूष होते.या निवडणुकीत अण्णांना आपण नगरपालिका सभागृहात बिनविरोध पाठविले पाहिजे असा मानस अनेकांनी व्यक्त केला व अण्णांची नगरसेवक म्हणून बिनविरोध निवड झाली.आता सुनीलआण्णांच्या दानशूरपणाची ख्याती मावळ तालुक्यात सर्वदूर पसरली होती.उपनगराध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आण्णांनी दुप्पट वेगाने काम सुरू केले .

तळेगांव शहरासह मावळ तालुक्यातील ग्रामीण भागातील जनता अण्णांना कामानिमित्त भेटायला यायची.आण्णा प्रत्येकाला भेटून त्यांची अडचण समजून घेऊ लागले.त्यांच्या कार्यालयात आता जनतेचा राबता सुरु झाला.कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाशी आण्णा आपुलकीने तसेच कुटुंबातील सदस्य असल्याप्रमाणे बोलतात, हे सामान्य जनतेला भावले.अनेक गावातील लोक आपल्या समस्या घेऊन यायचे व आण्णा त्या समस्या शांतपणे ऐकून घ्यायचे. ती समस्या ज्या विभागाची आहे त्या विभागासाठी त्यांनी स्वतंत्रपणे नेमलेले त्यांचे कार्यकर्ते पाठपुरावा करून समस्या सोडवायचे.माणसांच्या समस्यांचे निराकरण व्हायचे यामुळे आण्णांचा चेहराही खुलायचा.या कामाच्या पध्दतीमुळे जनतेला त्यांचे नेतृत्व आवडू लागले.जनतेची कामे आता वेगाने सुरू झाली.

आण्णांनी अनेक सामाजिक उपक्रम हाती घेऊन ते यशस्वीपणे राबविले.शिवजयंती व भीमजयंती एकत्रित साजरी करून सामाजिक सलोख्याचा वेगळा संदेश तालुक्यात दिला.मावळच्या ग्रामीण भागातील विध्यार्थ्यांना बोर्डाच्या परीक्षेला जाण्या-येण्याची अडचण लक्षात घेऊन स्वखर्चाने सर्व विद्यार्थ्यांना गाड्या घरापर्यंत उपलब्ध करून दिल्या.विद्यार्थ्यांनी अनावश्यक वेळ टळल्याने परीक्षेत यशही संपादन केले.महिलांसाठी विविध प्रशिक्षण शिबीरे आयोजित केली. जेष्ठ नागरिकांसाठी ‘माय माऊली फाउंडेशन’ स्थापन करून त्यांच्या विविध अडचणी सोडविल्या.विविध गावांना जोडणारे,वाड्या-वस्त्यांना जोडणारे रस्ते अण्णांनी स्वखर्चाने केले.’स्व.लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठानच्या’ माध्यमातून घेतलेली विभागवार आरोग्य शिबीरे लोकांच्या दुःखावर मलम ठरली.आण्णा आता कर्तृत्व सिद्ध करुन प्रत्येकाच्या घराघरांत व मनामनात शिरले होते.’लोकांसाठी काम करणारा लोकनेता’ म्हणून सुनील अण्णांची ओळख तालुकाभर झाली.

दातृत्व, कर्तृत्व, वक्तृत्व व त्याला नेतृत्वाची जोड देऊन आण्णा आता जनतेच्या हृदय सिंहासनावर आरूढ झाले होते.पुढे २०१९ साल उजाडले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले.गावा-गावांत पारावरच्या चर्चा सुरू झाल्या.विविध राजकीय पक्षांनी सर्वेक्षण सुरू केले.प्रत्येकाच्या ओठी एकच नाव होते ते म्हणजे सुनीलआण्णा शेळके.राज्य पातळीवर मावळ विधानसभा निवडणुकीची चर्चा झाली. राजकीय उलथापालथ झाली. विविध पक्षांचे उमेदवार जाहीर झाले.तालुक्यातील जनतेचे डोळे टीव्ही व वर्तमानपत्र यांकडे लागले होते.अण्णांना एका पक्षाची उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांचे हजारो समर्थक, चाहते त्यांच्या निवासस्थानी जमले. प्रत्येकाचे मन आणि डोळे भरून आले होते.राज्यपातळीवर घडामोडी सुरू झाल्या.मावळ राष्ट्रवादी काँग्रेसची प्रमुख मंडळी राज्याचे नेते मा.अजितदादा पवार यांचा निरोप घेऊन अण्णांच्या घरी पोहोचले होती. आण्णांनी आता लढायचेच असे ठरवले होते.सर्वसामान्य जनतेसाठी, मावळच्या सर्वांगीण विकासासाठी तालुक्यातील प्रमुख नेत्यांसोबत चर्चा करून त्यांनी मुंबई गाठली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दिमाखदार प्रवेश पार पडला अन आण्णांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी जाहीर केली.तालुक्यातील जनता आता आनंदून गेली.सुनिलआण्णांनी तालुक्यातील जनतेला साद घातली आणि त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी उत्स्फूर्तपणे हजारोंच्या संख्येने सहभागी लोकांनी पुढील दिशा स्पष्ट केली होती.अखेर तो निकालाचा दिवस उजाडला.न भूतो न भविष्यती असा विजय आण्णांचा झाला.मावळच्या राजकीय इतिहासात प्रथमच जनतेचे प्रेम मिळालेले एकमेवाद्वितीय म्हणून सुनीलआण्णा पुढे आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर प्रथमच मावळची जागा ‘घडयाळ’ चिन्हावर निवडून आली होती. पुढे नाट्यमयरीत्या देशाचे नेते मा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली ‘महाविकास आघाडीचा’ प्रयोग होऊन शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांचे सरकार अस्तित्वात आले.आमदारकीच्या शपथविधी सोहळ्यानंतर सुमारे वीस तास सभागृहात थांबून आण्णांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी तडफ दाखवून दिली

राज्यामध्ये विविध आमदार, मंत्र्यामध्ये सुनीलआण्णांच्या मताधिक्याविषयी चर्चा असते. मा.शरदचंद्रजी पवार साहेबांच्या गुडबुक मधील मा.अजितदादा पवार यांचे विश्वासू अशी आण्णांची राज्यभर ओळख निर्माण झाली आहे.कोविडच्या काळात हॉटस्पॉट ठरलेल्या मावळ तालुक्यात उभारलेली आरोग्य यंत्रणा,कोविड सेंटर रुग्णांना उपलब्ध करून दिलेल्या रुग्णवाहिका व त्या बरोबरचे आधाराचे शब्द कितीतरी कुटुंबियांना दिलासा देऊन गेले.आज तालुक्यात विविध विकासकामे प्रगतीपथावर आहेत.विविध रस्त्यांचे रुंदीकरण,विविध पुलांना मिळालेली मंजूरी,उपजिल्हा रुग्णालयांची मंजूरी,वडगांव येथील प्रशासकीय इमारतीला मिळालेली मंजूरी,विविध जलयोजनांना मिळालेली मंजूरी,महाराजस्व अभियानाच्या माध्यमातून लोकांची झालेली महत्वपूर्ण कामे ही आण्णांच्या कामाचा आवाका स्पष्ट करते.शालेय विद्यार्थ्यांना फी मध्ये दिलेली सवलत,पंढरीच्या वारकऱ्यांसाठी केलेली पाण्याची सोय,अनेकांची केलेली वैयक्तिक कामे,जनतेच्या दुःखाचे निवारण करुन त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याची वृत्ती आण्णांना असामान्यत्व बहाल करते.


जनतेच्या प्रश्नांवर अविरत, अखंडित,अविश्रांतपणे काम करून ‘लोकनेता’ ठरलेल्या या मावळच्या लाडक्या आमदार साहेबांचा म्हणजेच सुनिलआण्णांचा आज वाढदिवस.त्या निमित्ताने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सामाजिक,राजकीय काम करताना प्रचंड बळ लाभो,हीच वाढदिवसानिमित्त शुभेच्छा…

error: Content is protected !!