तळेगाव स्टेशन:
तळेगाव स्टेशन वरून कातवी कडे जाणा-या रस्त्याच्या बाजूला कचऱ्याचे ढीग पडले आहेत. या ढीगातून पसरणारी दुर्गंधी मुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या परिसरातून नागरिकांना चालत जाताना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.
तळेगावातील यशवंनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर कचरा टाकत आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून प्लास्टिक जन्य कचऱ्यामुळे पर्यावरण धोक्यात आले असल्याची ओरड वाढली आहे.
आंबी गावामध्ये नदीवर पुलाचे काम सुरू असल्यामुळे तळेगाव एमआयडीसी परिसरात जाण्यासाठी नागरिकांना तळेगाव कातवी रस्त्याचा वापर करावा लागत आहे. या ठिकाणी कामावर जाणारा कामगार वर्गाची संख्या लक्षणीय आहे. काही कामगार घरातून निघताना कचरा घेऊन या परिसरात टाकत आहे. यामुळे परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले असून तळेगाव दाभाडे नगरपरिषद व वडगाव कातवी नगरपरिषद दोन्ही याकडे कानाडोळा करत आहे.
स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत दोन्ही नगरपरिषदा आपल्या सहभाग नोंदवत आहेत. परंतु परिसरातील बकाल स्वरूप पाहता याकडे कोणाचेही लक्ष का नाही ? कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई कधी होणार ? परिसर स्वच्छ, सुंदर व नेटका राहण्यासाठी प्रशासन काम करणार का ? आदी प्रश्न नागरिक विचारत आहे. मागील काही वर्षांपूर्वी औद्योगीकरण होण्याआधी याच परिसरात सकाळच्यावेळी नागरिक मोठ्या प्रमाणावर मॉर्निंग वॉकसाठी येत होते. परंतु परिसरातील वाढता कचरा व दुर्गंधी यामुळे स्वच्छ व पुरेशी पोषक हवा मिळत नसल्याने नागरिकांनी याकडे पाठ फिरवली आहे.

error: Content is protected !!