पाण्याची घागर आणि जेवणाची पाटी डोक्यावर घेऊन तळ्याकाठी जाताना कोणाला पाहिलंय का? गावातील सगळे लोक कोरड्या पडलेल्या तळ्याच्या तळवटात बसून मस्त पैकी हातात भाकर आणि त्यावर लसणाची चटणी घेऊन चेहऱ्यावर भाबड हसं ठेवत खाताना कोणी पाहिलंय?
लहान थोर, महिला भगिनी सगळे अगदी घर झाडून मळूबाईच्या तळ्याकाठी आनंदाने गप्पा मारताना पाहिलंय कोणी??
होय…मी पाहिलंय!
चैत्र महिन्यातील एक दिवस निवडून वन भोजन ठरलेलं. दोन चार दिवस अगोदर अख्या गावातून दवंडी पिटवली जायची.मग गावातील माता भगिणींची स्वयंपाकाची लगबग सुरू व्हायची. घरात जे काही असेल ते गोड मानून खाण्यात एक वेगळंच समाधान असायचं.
प्रत्येकाच्या भाकरी वेगवेगळ्या. कोणाच्या तांदळाच्या, कोणाच्या नाचणीच्या, कोण बाजरीची भाकर तर कोण ज्वारीची भाकरी थापायचे. सोबतीला लाल वाळलेल्या मिरच्या लसूण टाकून पाट्यावर मस्तपैकी रेंगासलेल्या, थोडं तेल मीठ टाकून तव्यावर दोन थेंबात परतलेली ती लसणाची चटणी अगदी दोन चार भाकरी कधी संपवायची ते कळतही नव्हतं.
रानात नुकत्याच आलेल्या कैऱ्यांचा लाल बुकणा टाकून केलेला ठेचा तोंडाला अगदी पाणी आणायचा.कच्ची करवंद अशीच ठेचली जायची.
आमटीला काळे वाटाणे असायचेच, कोणी अख्खा मसूर बनवायचे तर कोणी वालाची उसळ आणायचे. बाजारहाट झालाच कोणाच्या घरी तर बटाटा वाटाणा घालून मस्त श्याक भाजी नाकाला सुगंधित करून टाकायची.
हे सगळं पाटीत भरून मस्त पैकी वन भोजनाला निघायचे आणि सगळ्यांनी एकत्रपणे हसत खेळत, गप्पा मारत जेवण फस्त करायचे.यात खूप मोठं समाधान आणि आनंद असायचा…..!
आता आपल्याला हे समाधान कोठे मिळेल काय?
हळू हळू सगळंच लोप पावत चाललय. जुन्या रुढी परंपरेवर नवीन येऊ घातलेली पाश्चात्य संस्कृती उर बडवत चालली आहे. संस्कृतीचा वारसा आपणच लपवला आहे. होळीला *फोदे* म्हणून ओरडण्याची आता आपल्याला लाज वाटू लागली आहे.
कधीकधी सगळं सोडून निवांत ठिकाणी एकटच बसावसं वाटतं. जुन्या आठवणींत रमताना आपणच आपल्याला विसरावसं वाटतं.खरंच, काही जुन्या संकल्पना खूप काही शिकवून जातात. त्यापैकीच एक वन भोजन
एकत्रतेतून नुसतं खाणच होत नाही तर विचारांची देवाणघेवाण होते. माणूस बोलता होतो. अडी अडचणी मांडल्या जातात. नसला पैसा खिशात तरी मानसिक पाठबळ दिलं जातं. पाठीवर हात ठेवून तू फक्त लढ म्हटलं जातं. माता भगिनी एकमेकींशी संवाद साधतात. त्यांनाही रोजच्या रहाटगाड्या मधून थोडीशी मोकळीक मिळते.
*हाच तर उद्देश असावा वणभोजनाचा….!!!*
(शब्दांकन -तुळशीराम जाधव)