क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज योगिराज श्रीमंत योगी…!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यभूमी चा खरोखरच अभिमान वाटतो.
मुठभर मावळ्यांच्या साथीने अखंड स्वराज्याचे स्वप्नं पाहणारा आणि ते स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी अखंड आयुष्य वेचणारा एकमेव “जाणता राजा”!
छत्रपती घडले ते फक्त आईसाहेब जिजाऊमुळे! आईलाच जर स्वराज्याचे डोहाळे लागले तर जन्माला येणारं बाळ उपजतच शूरवीर असणारच!
छत्रपतींवर गर्भसंस्कार करणारी आईच ती…!
जिजाऊ…! जिज्ञासा, जागृती आणि उत्कर्ष यांचा सुरेख संगम जिच्या ठिकाणी झाला तीच जिजाऊ…!
आजच्या दिवसाचे निमित्त साधून आपण शिवरायांच्या गुणांवर प्रकाश टाकण्याचा थोडासा प्रयत्न करू…
शिवराय म्हणजे प्रत्यक्ष शिवाचाच अवतार म्हणायला काही हरकत नाही.
भारतीय सेनादलाचे विशेषतः नौदलाचे निर्माते, संस्थापक!
आदर्श मुलगा, जबाबदार नवरा, द्रष्टा पिता, धोरणी प्रशासक, कनवाळू राजा!
स्त्रीला माता मानणारे काही मोजकेच राजे झाले. त्यापैकी सर्वांत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज..!
महाराजांच्या दरबारात स्त्री कधीही नाचवली गेली नाही.
तत्वांशी तडजोड कधीच नाही. फक्त गुणवत्तेला वाव दिला. जातीपातीच्या राजकारणाला अजिबात थारा नाही.
रयतेने राजा केलेला एकमेव राजा!
कायम रयतेच्या हिताचे, अब्रूचे, आत्मसन्मानाचे रक्षण आणि रयतेचा सर्वांगीण विकास हेच धोरण!
पुढील सर्व पिढ्यांना मानसिक दास्यातून नेहमीसाठी मुक्ती देणारा एकमेव राजा!
चारित्र्य हे स्त्रीचेच नाही तर पुरुषाचेही अलंकार आहे, हे सप्रमाण सिद्ध करणारा राजा!
परिस्थितीला शरण जाणारे, वेळेची गरज लक्षात घेऊन धोरणातील लवचिकता राखणारे असे छत्रपती शिवाजी महाराज!
नियोजन, उजळणी आणि सराव याशिवाय प्रभुत्त्व निर्माण होत नाही आणि प्रभुत्वाशिवाय स्वप्नं सत्यात उतरत नाही, हे जगणारा राजा!
स्त्री ही उपभोग्य नाही, ती अबला नाही हे कृतीतून दाखवून देणारा राजा!
कर्तव्य बजावत असताना अधिकारांची काळजी घेण्याची शिकवण देणारा आणि अधिकाराविषयी जागरूक असताना कर्तव्य दुर्लक्षिले जाणार नाही, याची शिकवण देणारा जाणता राजा!
निर्व्यसनी, चारित्र्यसंपन्न, पारंगत, कुशल, विचारी, धोरणी, मुत्सदी युवकच राष्ट्राची खरी संपत्ती आहे हे जाणणारा जाणता राजा!

महाराजांचे असे अनेक गुण आपल्याला प्रकाशित करता येतील. आजच्या दिवसाचे निमित्त साधून मी एवढंच सांगीन की शिवजयंती साजरी करताना दररोज थोडा वेळ का होईना, आपण महराजाच्या गुणांचे चिंतन करावे. फक्त दाढी मिशिपुरता आदर्श न घेता राजांचे गुण आपल्या अंगी कसे बाळगता येतील यावर विचार करावा. हळू हळू का होईना, आपण चांगले वागण्याचा प्रयत्न करावा. व्यक्तिगत हेवेधावे करण्यापेक्षा समाजाचा उत्कर्ष जपावा. शिवाजी महाराजांचा नुसता अभिमान बाळगण्यापेक्षा महाराजांना अभिमान वाटेल, असं काहीतरी केलं पाहिजे.
भविष्यात खऱ्या अर्थाने शिवाजी घडवायचे असतील तर शिक्षणाला प्राधान्य दिलं पाहिजे. प्रत्येक वर्षाला महाराजांचा एक तरी धडा शिकवला गेला पाहिजे. बाहेरच्या देशात व्यवस्थापन क्षेत्रात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांचे संपूर्ण चरित्र शिकविले जाते. पण आपल्याकडे अजूनही दुर्लक्षिले जाते.
घरा घरात शिवाजी तयार व्हायला हवेत. मनामनात शिवाजी रुजवायला हवेत….! शिवचरित्र लहानांपासून मोठ्यांपर्यंत पोहोचवायला हवं. त्यासाठी संकल्पपूर्वक विचार व्हायला हवा. गावाचं, समाजाचं, राष्ट्र कल्याणाचे हे रोपटे हळू हळू वाढवायला हवं…!
जय शिवराय..!!
( शब्दांकन- तुळशीराम जाधव)

error: Content is protected !!