पवनानगर येथील शांताई हाॅटेलमध्ये हाॅटेल बंद होण्याच्या वेळेस जेवण देण्याच्या कारणावरून हाॅटेलचे मॅनेजर व वेटर यांना शिविगाळ करत मारहाण करणार्या युवकांना लोणावळा शहर पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी (21 मार्च) रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली होती.
हाॅटेलचे मॅनेजर विजय दादू गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रमेश ठुले, सचिन तोंडे, भावेश राक्षे, ढोरे (पुर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यासह पाच अनोळखी इसम यांच्या विरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार व गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार वरील सर्वजण पवनानगर येथील शांताई हाॅटेलमध्ये रविवारी रात्री 9 वाजता जेवणासाठी आले होते. त्यांचे जेवण झाल्यानंतर रात्री 9.30 वाजण्याच्या सुमारास रमेश ठुले यांचे चार ते पाच मित्र तेथे आले. त्यांना देखील येथेच जेवण द्या असे सांगितल्यानंतर गायकवाड यांनी दहा वाजत आल्यात, हाॅटेल बंद करण्याची वेळ झाली आहे.
त्यांना जेवण येथे न देता, हवं तर जेवण पार्सल मध्ये बांधून देतो असे सांगितले. यावर वरील सर्वांनी गायकवाड व हाॅटेलमधील वेटर यांना शिविगाळ केली, मारहाण करत हाॅटेलमधील टेबल खुर्च्या तोडल्या, काऊंटरवरील बिलिंग मशिन फोडली, हाॅटेलच्या बाहेरील एका चारचाकी वाहनाच्या काचा फोडल्या, उभ्या असलेल्या दुचाकी ढकलून दिल्या असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक टी.वाय. मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल लवटे यांनी सर्व आरोपींचा शोध घेत त्यांना अटक केली आहे.