देहूरोड

सायंकाळची वेळ…शेतात विविध प्रकारची कामे सुरु…अचानक सोसाट्याचा वारा सुरु झाला…पालापाचोळा उडू लागला..अंधारुन आले…विजांचा कडकडाट सुरु झाला…ढगांच्या गडगडाटात अवकाळी पाऊस सुरु झाला…सारा परिसर जलमय होण्यास सुरुवात झाली..मावळ तालुक्यातील शेलारवाडी व परिसरात अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने नागरिकांची त्रेधा तिरपीट उडाली…सायंकाळी पाचच्या सुमारास आलेल्या या पावसाने हवेत गारवा निर्माण केला…शेतकऱ्यांची वैरण झाकण्यासाठी धावपळ सुरु झाली..उन्हाळी वाळवणीचे पदार्थ तयार केलेल्या महिलांची धांदल उडाली…वर्षभर शाळा बंद असल्याने बालगोपाळांनीही या पावसाचा आनंद लुटला…कागदी होड्या करुन वाहत्या पाण्यात सोडताना लहान मुले चिंब झाली होती..चाकरमानांची कामावरुन घरी परतण्याची वेळ असल्याने त्यांचीही तारांबळ उडाली…वारा जोराचा असल्याने वीजही गायब झाली…सर्व रस्त्यात ठिकठिकाणी तळी निर्माण झाली..
अचानक आलेल्या या अवकाळी पावसाने शेतीचे व वैरणीचे नुकसान झाल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते योगेश माळी यांनी दिली..अनेक दिवसांनंतर पावसात चिंब भिजलो असल्याचे उद्योजक मृणाल माळी म्हणाले…कोरोनाच्या नैराश्यमय परिस्थितीत फारशी वित्तहानी न करणारा हा अवकाळी सुखद गारवा देऊन गेला,असे राजू भेगडे सर म्हणाले…अचानक आलेल्या या पावसामुळे धुलीवंदनापूर्वीच बच्चेकंपनीने धुळवडीचा आनंद लुटला…
error: Content is protected !!