तळेगाव दाभाडे: माहेरात कृषिप्रधान संस्कारांची बीजे खोलवर रुजलेली,सासरी वारकरी संप्रदायाचा ठेवा. शेतीतील घामात राबत असलेला पिता तिचा आदर्श. त्यांची प्रगतशील शेतकरी ही बिरुदावली तिच्या श्रद्धेचे ठिकाण. शेतीत करिअर करायचे या ध्यासातून ती शिकली,पुढे लग्न करून मावळात आली. मावळातील ती पहिली महिला व्यावसायिका आहे,ती ग्रीन व पाॅलीहाऊसेस उभारण्याची कामे करते. शेटेवाडीतील नलिनी स्वामी शेटे असे या कृषीकन्येचे नाव.
तिने सूर्योदय ग्रीन हाऊसेस या फर्मने तिचा व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायाच्या वाढीसाठी ती आणि तिचा पती स्वामी शेटे याची धडपड सुरूच आहे. आजपर्यंत आपण यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्री उभी राहिली असल्याचे अनेक वेळा ऐकल,पण माझा पती माझ्या पाठिशी उभा आहे,त्याच्या सोबतच मी माझा व्यवसाय वाढवणार असल्याचे नलिनी ताई विनम्रपणे मान्य करतात. न-हे तील शिवाजी तात्याबा कुटे प्रगतशील शेतकरी, यांची नलिनी लाडकी लेक. शेतीतील मातीची ओढ असलेल्या कुटे परिवाराने लेकीला शेतीत करिअर करायचे म्हणू ज्ञ श्री शाहू मंदिर महाविद्यालयात प्रवेश घेतला.
शेतीची आवड शिक्षण शेती आणि हेच करिअरची दिशा ठरल्याने नलिनी यांचा कल आधुनिक व तंत्रज्ञानाच्या शेतीकडे वळला. या महाविद्यालयात त्यांनी पाॅलीहाऊस मधील शेती व्यवस्थापन या विषयाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. दहा वर्षापूर्वी त्या स्वामी शेटे यांच्याशी विवाहबद्ध झाल्या. त्यानंतर दोन वर्षात या व्यवसायाला हात घातला. या कामात पतीची त्यांनी मदत घेतली,तोही याच क्षेत्रात शिकलेला. त्यामुळे रथाची चाके एक सारखी धावू लागली. स्वामी शेटे हे शेटेवाडीतील,गुरूवर्य किसन महाराज शेटे यांचे नातू. किसन महाराज शेटे यांनी मावळात वारकरी संप्रदयाची बीजे खोलवर रुजवली. तेही शेतकरीच,दुभत्या गाई म्हशीचा गोठा हे त्यांचे वैभव. पंचक्रोशीतील सर्वात मोठा शेतकरी अशी त्याचीही ओळख. अंद्रायणी काठावरील लाल मातीतील तेही सधन शेतकरी.
मोकळ्या ओसाड खोलखचके असलेल्या जमीनीवर शासनाचा डोळा पडला आणि धरण संपादनात शेटे कुटूबियांची शेकडो जमिनीचे संपादन झाले. धरणग्रस्त शेटे गाव सोडून तळेगावात रहायला आले. स्वतःची शेती करणारे तिचे सासरे नोकरी करू लागले. अशा परिवारातील या सूनने पालघर येथून दहा गुंठेत काम घेऊन आपल्या कामाचा श्रीगणेशा केला,पालघर पाठोपाठ मावळातील तळेगाव आंदर मावळ, नाणे मावळ ,पवन मावळात काम केले. जुन्नर आंबेगाव हवेलीत पाॅलीहाऊस बांधण्याचे काम केले. या अनुभवातूनच कोल्हापूर सातारा,सांगली,औरंगाबाद,रायगड,कर्नाटक विशाखापट्टणम ,हैद्राबाद येथेही त्या काम करीत आहे.
पंधरा ते वीस मंजूरांची टीम काम करते. या सगळ्याचा माॅनिटर पती स्वामी. नलिनी ताई सर्वसामान्य शेतक-यांना आधुनिक शेतीसाठी प्रवृत्त करतात, पाॅलीहाऊसची शेती उभारणीस मदत करण्याच्या स्वभावातूनच त्यांना या व्यवसायात यश मिळतेय. बॅकेच कर्ज, मार्केटिंगची माहिती ,शासकीय अनुदान मिळवून देणे हेही काम त्यातच आली. पाॅलीहाऊसच्या शेतीसाठी जमीन, वीज पाणी रस्ता याचे फार महत्व आहे.दहा गुठेचे काम करायला वीस दिवस लागतात.
निसर्गावर अवलंबून असलेल्या बेभरवशाची शेतीवर माझा शेतकरी अवलंबून आहे. गारपीट,पावसाचा अनियमितपणा,पिकावरील रोगराई यावर आधुनिक शेती हा उत्तम पर्याय आहे. पाॅलीहाऊस मध्ये फूलशेती व भाजीपाला उत्तम प्रतीचा घेता येतो. कमी पाण्यातील ही शेती आहे. किफायतशीर असल्याचे आपणाला जाणवेल असा विश्वास त्या शेतक-यांना नेहमी देतात. त्यामुळे त्यांनी बांधलेल्या पाॅलीहाऊस मधील फुले बाजारपेठेत भाव खाऊन जातात. तर भाजीपाला अनेक पंचतारांकित हॉटेल्स मधून अनेक शेतक-यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देतात. सध्या त्याच्या व्यवसायाचा आवाका आहे,दहा गुंठे ते दोन एकराच्या कामाचा असला तरी त्यांना मोठमोठी पाॅलीहाऊसेस बांधुन शेतकऱ्याची स्वतःची कंपनी काढता यावी या स्वप्नाची आहे.